सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. तालुक्यातील सालपे येथील कोळेकर वस्तीनजीक असलेल्या पंधरकी नावच्या शिवारातील विहिरीत बुडून आई व मुलाचा मृत्यू झाला.
सोमवार दिनांक ३० रोजी सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी माधुरी लक्ष्मण कचरे (वय २८) व त्यांचा मुलगा शंभूराज लक्ष्मण कचरे (वय सात, दोघेही रा. सालपे, ता. फलटण) मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, माधुरी कचरे या मेंढपाळ, शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना दोन मुले व मुलगी आहे. मोठी मुलगी व एक मुलगा पाचगणी येथे आश्रमशाळेत शिक्षणासाठी आहेत. दरम्यान, माधुरी कचरे त्यांचे पती लक्ष्मण कचरे व लहान मुलगा शंभूराज हे तिघेच घरी सालपे येथे राहात होते. लक्ष्मण कचरे हे पाचगणीला मुलांकडे गेले होते.
माधुरी या मुलगा शंभूराज यास घेऊन कोपर्डे गावच्या हद्दीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालयानजीक येऊन तेथील दुकानातून लहान मुलांसाठी काही तरी खाऊ घेऊन त्या चालत पंधरकी नावच्या शिवारातील विहिरीकडे गेल्या. त्याच विहिरीत ते दोघेही पडून पाण्यात बुडून त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत दादा यशवंत कचरे (वय ३७, रा. सालपे, ता. फलटण) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हवालदार मदने तपास करत आहेत.