सातारा प्रतिनिधी | राज्यात मार्च, एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांमध्ये, तर मे महिन्यात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून, पंचनामे पूर्ण होताच शासनाच्या धोरणानुसार मदतीचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याची मागणी आमदार शशिकांत शिंदे, राजेश राठोड, अभिजित वंजारी, प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांनी केली होती. त्यांच्या मागणीची दाखल घेत मंत्री मकरंद पाटील यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. शेती पिकांचे एकूण ७५ हजार ३५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, एक लाख ६८ हजार ७५० शेतकरी प्रभावित झाले असल्याचे आणि त्यासाठी सुमारे २१३ कोटींची नुकसान भरपाई अपेक्षित असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
मंत्री मकरंद पाटील म्हणाले, की राज्यात वीज कोसळून ६३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. ज्यांना अद्याप मदत मिळाली नाही, त्यांना ती दोन दिवसांत देण्यात येणार आहे. शेती पिकांच्या बाबतीत एकूण ७५ हजार ३५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, एक लाख ६८ हजार ७५० शेतकरी प्रभावित झाले आहेत. त्यासाठी सुमारे २१३ कोटींची नुकसान भरपाई अपेक्षित आहे.
ओल्या दुष्काळासंदर्भात बोलताना मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले, की २४ तासांत ६५ मिलिमीटर पेक्षा अधिक अतिवृष्टी अथवा सलग पाच दिवस दहा मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाच्या घटनांवर शासन निर्णयानुसार ओला दुष्काळ घोषित केला जातो. सध्या आठ जून २०२५ पर्यंतचे पंचनामे सुरू असून, त्यानंतर संबंधित मदतीचा निर्णय घेण्यात येईल. घरांच्या पडझडीच्या मदतीसाठी विभागवार निधी वितरित करण्यात आला असून, कोकण, नाशिक आणि अमरावती विभागांना प्रत्येकी पाच कोटी, पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागांना प्रत्येकी १२ कोटी, तर नागपूरला दहा कोटींची निधी वितरित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कोणतीही मदत प्रलंबित असेल किंवा वितरणात अडचण असेल, तर जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती देऊन, आवश्यक ती मदत तत्काळ दिली जाईल, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.