कराड प्रतिनिधी | राजकीय विषयावर चर्चा सुरू असताना शिवीगाळ करू नका, असे सांगितल्याचा राग मनात धरत युवकावर कोयत्याने डोक्यात, पाठीवर तसेच हातावर वार करण्यात आल्याची घटना कराड तालुक्यातील विजयनगर येथे घडली. या हल्ल्यात युवक गंभीर झाला असून 3 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहन हनुमंत ताटे (वय ३१) रा. मुंढे ता. कराड असे जखमीचे नाव आहे. त्याने याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर तानाजी चव्हाण रा. विजयनगर ता. कराड यांच्यासह त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रोहन ताटे २९ जून रोजी रात्री ९.३० बाजण्याच्या सुमारास विजयनगर येथील एमएसईबी चौकात भुर्जी पाव खाण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याठिकाणी सागर चव्हाण त्याच्या दोन मित्रांसोबत भुर्जी पाव खाण्यासाठी आलो होता.
याप्रसंगी राजकीय विषयावर चर्चा सुरू असताना सागर याने रोहनला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रोहनने शिवीगाळ करू नका, असे सागरला सांगितले. त्यानंतर त्याचा राग मनात धरून ‘तुला आता जिवंत ठेवत नाहीं’, असे म्हणत सागरने रोहनच्या डोक्यावर, पाठीवर, हाताबर कोयत्याने वार केले. हा हल्ला सुरू असताना रोहनला सागरसोबत आलेल्या अन्य दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.