सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सध्या सातारा, मुंबई आणि कोकण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून, पुढील चार ते पाच दिवस पुणे, मुंबई, सातारा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे छोट्या छोट्या पुलांवर पाणी आले आहे. तसेच शेतांच्या सरीमध्ये व ओढेमध्ये पाणी साचल्याने पिकाचे देखील नुकसान होऊ लागले आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याशी पावसाने चांगले झोडपून काढले असून पुसेगाव-फलटण मार्गावरील वेटण ओढ्यावर अजूनही पूल नसल्यामुळे काटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेर तलावातील पाण्याचा फुगवटा या ओढ्यात साचल्यामुळे शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा छातीइतक्या पाण्यातून बाहेर काढावा लागत आहे.
काटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांना आपला कांदा नुकसानीपासून वाचवण्यासाठी 14 मजुरांच्या मदतीने प्रति पिशवी 90 रुपये खर्च करून तब्बल 400 फूट अंतरावरून कांदा बाहेर काढला. त्या शेतकऱ्याचे कांदा पीक वाचवण्याची मजुरांनी देखील आपल्या जीवाची पर्वा केली नाही. त्या मजुरांनी देखील कांद्याच्या पिशव्या जीव धोक्यात घालून पाण्यापलीकडे नेला.
काटेवाडी भागात पाण्याच्या अडथळ्यामुळे यंत्र किंवा बैलांच्या सहाय्याने शेती करणे अशक्य झाले असून, शेतकरी हातानेच पेरणी करत आहेत. त्यामुळे या वेटण ओढ्यावर किमान साकव पूल तरी लवकरात लवकर बांधावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, यंदा मान्सूनने 15 दिवस आधीच प्रवेश केला असून, संपूर्ण देशभर तो चांगलाच सक्रिय झाला आहे. पुढील पाच दिवस मुंबई, ठाणे तसेच कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.