सातारा पोलिसांची मोठी कारवाई; घरफोड्या करणाऱ्या टोळीकडून 24 तोळे सोने जप्त

0
530
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वाई आणि सातारा शहर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून घरफोडीच्या घटना घडत होत्या. या घरफोड्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच अटक केली. या कारवाईत दोघांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल २४ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत २३ लाख रुपये इतकी आहे. टोळीचा मुख्य सूत्रधार मात्र पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दिपक संतोष पाटणे (वय २३, मूळ रा. वरवडी, ता. भोर, सध्या रा. विंग, ता. खंडाळा) आणि आशुतोष उर्फ पप्पू प्रदीप भोसले (वय २७, रा. बावधन, ता. वाई, सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार लोकेश सुतार (रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) हा असून, तो सध्या फरार आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील वाई आणि सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. वाईतील साक्षी हाईट्स परिसरात १९ जून रोजी भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी २.१७ लाखांचा ऐवज लंपास केला होता. या पार्श्वभूमीवर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने विशेष कारवाईची मोहीम राबविण्यात आली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना या गुन्ह्यामागे रेकॉर्डवरील गुन्हेगार लोकेश सुतार याचा हात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो पसार झाल्याचे आढळले. मात्र, अधिक तपासात सुतार याने हे गुन्हे इतर दोन साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती २४ जून रोजी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दीपक पाटणे आणि आशुतोष भोसले यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान, दोघांनीही गुन्ह्यांची कबुली दिली आणि लोकेश सुतार हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले. या टोळीने वाई आणि सातारा शहरातील एकूण ४ घरफोड्या केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेले २३ लाख ४ हजार रुपये किमतीचे २४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोहित फार्णे, फौजदार विश्वास शिंगाडे, परितोष दातीर आणि त्यांच्या पथकातील संतोष सपकाळ, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित माने, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, हसन तडवी, मुनीर मुल्ला, रोहित निकम, सचिन ससाणे, रवि वर्णेकर यांनी केली.