सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत सातारा तालुका राष्ट्रवादीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत खा. नितीन पाटील यांनी पक्ष वाढीसाठी नेमका कोणता पर्याय योग्य होऊ शकतो याबाबत माहिती दिली. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षवाढीसाठी संघटनात्मक बांधणीची गरज असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यांचाच आदेश मानून जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी तळागाळापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवावीत, असे आवाहन खा. नितीन पाटील यांनी केले.
खासदार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, महिला कार्याध्यक्ष सीमा जाधव, कार्याध्यक्ष संजय देसाई, जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, किसन वीर कारखान्याचे संचालक सचिन जाधव, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज देशमुख, अरविंद कदम, बबन साबळे, किरण साबळे, इंद्रजित ढेंबरे, शशिकांत वाईकर, युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, युवती प्रदेश संघटिका स्मिता देशमुख उपस्थित होते.
खासदार पाटील म्हणाले, ”कार्यकर्त्यांनी पदाचा, नावाचा विचार न करता राष्ट्रवादी पक्ष हा जिल्हाभर पसरला पाहिजे, हेच ध्येय प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. तरुणांना डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध संकल्प केले आहेत. ते तडीस नेण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. कार्यकर्ता हा केवळ कार्यकर्ताच न राहता त्याला बळ दिले तर तो नक्कीच पक्षाचा पदाधिकारी बनू शकतो. मात्र, त्या तळमळीनेच प्रत्येकाने राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यावेळी बाळासाहेब सोळसकर, इंद्रजित ढेंबरे, अरविंद कदम, सचिन जाधव यांचे मनोगत झाले.