सातारा प्रतिनिधी | मैत्रीण दुसऱ्या मुलाबरोबर फिरताना दिसल्यामुळे तालुक्यातील एका अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेबाबत आत्महत्या केलेल्या मुलाच्या भावाने शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित मुलाने त्याच्या मोठ्या भावाला फोन केला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, तेव्हा माझे एका मुलीवर प्रेम आहे, असे त्याने भावाला सांगितले, तसेच माझे तिच्यावर प्रेम असले, तरी ती आज दुसऱ्या मुलाबरोबर लॉजमधून बाहेर पडताना मला दिसली. तिने मला धोका दिला आहे. मी आता जगणार नाही, असे म्हणून त्याने फोन कट केला.
त्यानंतर मोठ्या भावाने त्याच्या मोबाईलवर वारंवार फोन केले; परंतु त्याचा फोन बंद असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर भावाने परिसरात त्याचा शोध सुरू केला; परंतु तो आढळून येत नव्हता. रात्री साडेआठच्या सुमारास भाऊ व त्याचा मित्र संबंधित मुलाचा शोध घेत होते. या वेळी जानाई-मळाई डोंगराच्या पायथ्याला एका ओढ्याशेजारी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत संबंधित मुलगा आढळून आला. याबाबत त्याने तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. हवालदार खाडे तपास करत आहेत.