सातारा प्रतिनिधी । राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे समता दिंडी व रॅली सातारा शहरातून काढण्यात आली. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून आज श्रीमंत प्रतापसिंह महाराज हायस्कूल, राजवाडा, सातारा येथे थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन संविधान प्रास्ताविकेचे देखील वाचन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी समता दिंडीस हिरवा झेंडा दाखवून दिंडीस सुरुवात केली. समता दिंडीचा समारोप नगर परिषद चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसर या ठिकाणी करण्यात आला. समता दिडीमध्ये साता-यातील श्रीमंत प्रतापसिंह महाराज हायस्कूल, कन्याशाळा तसेच शासकीय वसतिगृहामधील मुले मुली सहभागी होते. समता दिंडीच्या समारोप प्रसंगी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करुन उपस्थित सर्व विद्याध्यर्थ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.
दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन येथे विविध स्पर्धेतील विजेते व इयत्ता 10 वी च्या विभागीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, संविधानाची प्रास्ताविका व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन चरित्र व समाजकार्य या विषयावर प्राध्यापक निरंजन फरांदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. कांचन जगताप, शाहू फुले आंबेडकर प्रबोधन मंचाचे प्रा. केशव पवार, चित्रकार श्री. सतिश गायकवाड, प्रा. डॉ. प्रदिप शिंदे, समाजभूषण पुरस्कार्थी शाहीर तुकाराम कांबळे, शासकीय वसतिगृहाचे अधिक्षक व सामाजिक न्याय भवन या परिसरात कार्यरत असलेल्या कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.