शाळेत पालक मेळावा सुरू असताना केली चोरी; 2 तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
1482
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मुलांच्या प्रवेशाचे कारण सांगत शाळेत येऊन शिक्षिकेचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या संशयित आरोपीस अवघ्या दोन तासात अटक केली आणि जमिनीत पुरून ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचा 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात म्हसवड पोलिसांना यश आले.

जिल्हा परिषद शाळा पळशी येथील शिक्षिका प्रतिभा शरद कुल यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात त्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरून घेऊन गेल्याबाबत चोरीची तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली असता शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये एक अज्ञात व्यक्ती शिक्षकांच्या स्टाफ रूममध्ये येऊन त्यांनी या शिक्षिकेच्या पर्सच्या आतमध्ये ठेवलेल्या पॉकेटची चैन उघडी करून त्यामधील सोन्याच्या रिंगा, सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी चोरून घेऊन गेलेले दिसले.

या अनुषंगाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेजमधील दिसणाऱ्या व्यक्तीच्या शोधासाठी पथक तयार करून या व्यक्तीची माहिती घेतली असता तो व्यक्ती धामणी गावातील मनोज सुरेश घमंडे (वय 40) हा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने त्याला पकडण्यासाठी तांत्रिक बाबींचाही उपयोग करून संशयित आरोपीस शिताफीने पाठलाग करून पकडल्यानंतर त्याला चोरलेल्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या आरोपीला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेले सर्व दागिने हे धामणी गावातील मोकळ्या पटांगणामध्ये खड्डा करून पुरून ठेवले असे सांगितल्यानंतर हे सर्व दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले.

अवघ्या दोन तासात या चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व पोलीस कर्मचाऱ्यांना यश आले असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल या संशयित आरोपीकडून हस्तगत केला आहे. त्याच्याकडे या चोरीच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता काल सर्वत्र चालू झालेल्या शाळेच्या अनुषंगाने हा व्यक्ती मुलांच्या ऍडमिशनच्या बहाण्याने या शाळेमध्ये आलेला होता. त्याने पालक मेळावा चालल्याचे बघून संधी साधून शिक्षक स्टाफ रूममध्ये जाऊन तिथे ठेवलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरलेले होते. परंतु ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे तात्काळ तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 2 तासात हा गुन्हा उघडकीस आल्यामुळे तक्रारदार यांचे चोरीस गेलेले दागिने त्यांना मिळाले. संशियतास अटक करून आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली.

चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या दोन तासात लावून सर्व सोन्याचे दागिने परत मिळाल्यामुळे सर्वत्र म्हसवड पोलिसांचे कौतुक होत आहे. ही कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, देवानंद खाडे, राजेंद्र कुंभार, अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतीश जाधव यांनी केली.