कराड प्रतिनिधी | कराड येथील प्रीतिसंगम परिसरातील स्वामीच्या बागेत काही दिवसांपूर्वी घोणस या विषारी जातीच्या सापाची ११ पिल्ले सर्पमित्रांनी पकडली होती. त्यानंतर देखील सर्च ऑपरेशन राबवित पुन्हा १ पिल्लू पकडले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिल्ले आढळत असल्याने बाग बंद ठेवण्यात आली होती. मात्र, काल रविवारी रात्री एक महिलेला सर्प दंश झाल्याची घटना घडली. तेव्हा एक पिल्लू पकडण्यात आले. त्यानंतर आज सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा बागेत सर्प मित्रांनी सर्च ऑपरेशन राबविले व एका घोणसेच्या पिल्लाला पकडले असून आतापर्यंत घोणस विषारी जातीच्या सापाच्या पिल्लाची संख्या १४ झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी एक महिलेला प्रीतिसंगम परिसरात सर्प दंश झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर महिलेल तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी रविवारी पुन्हा घोनसेच्या पिल्लांना पकडण्यासाठी सोमवारी शोध मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज सोमवारी अकाली सर्प मित्र बबलू लोहाना, अजय महाडिक, मयूर लोहाणा, गणेश काळे, अजय महाडिक, नीलेश पाटील, विशाल साठे, श्रीकांत नाटेकरी यांच्यासह काही सर्पमित्र व माजी नगरसेवक सुहास जगताप प्रीतिसंगमवरील बागेत दाखल झाले.
त्यांनी घोणसच्या पिल्लाची शोधाशोध करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना एक पिल्लू बागेत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आले. त्यांनी त्या पिल्लाला बंद डब्ब्यात पकडले. या ठिकाणी आज जरी घोणसेचे पिल्लू पकडले असले तरी अद्यापही काही पिल्ले या ठिकाणी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी देखील बागे बाहेर दिवसा व रात्रीच्या वेळी फिरताना काळजी घेण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
सर्च ऑपरेशनमध्ये आज एक पिल्लू सापडले
कराड येथील प्रीतिसंगम घाट परिसरात काही दिवसांपूर्वी घोणस या सापाची अकरा पिल्ले आढळून आली. या ठिकाणी आमच्या कराड मधील प्राणी मित्र व डब्ल्यू आर के संस्थेचे सदस्य मयूर लोहाना, गणेश काळे, अजय महाडिक, नीलेश पाटील, विशाल साठे, श्रीकांत नाटेकरी आणि आम्ही सर्वांनी पिल्ले पकडून सुरक्षितस्थळी सोडून दिली. काल शनिवारी एका महिलेला सर्पदंश झाल्यानंतर आज पुन्हा बागेत सर्च ऑपरेशन राबविले एक पिल्लू ताब्यात घेतल्याची माहिती सर्पमित्र बबलू लोहाणा यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘ शी बोलताना दिली.