मे महिन्यातच महाबळेश्वरचं सौंदर्य फुललं; लिंगमळासह जिल्ह्यातील धबधबे फेसाळले

0
276
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये पडलेल्या पावसामुळे लहान मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. महाबळेश्वरमध्ये पडलेल्या पावसामुळे लिंगमळा धबधबा मे महिन्यातच फेसाळला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अनेक धबधबे देखील आपल्या सौंदर्यामुळे पर्यटकांना त्यांच्याकडे आकर्षित करू लागले आहेत.

महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून महाबळेश्वरला पर्यटक भेटी देत असतात. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये होत असलेल्या विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. रविवारी रात्री 25 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच सोमवारीही महाबळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे येथील वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा ओसांडून वाहू लागला आहे. महाबळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला असून शेतीसह नदी नाले दुतडी भरून वाहू लागले आहेत. प्रसिद्ध असणारा लिंगमळाचा धबधबा फेसाळला असून या धबधब्याला पाहण्यासाठी महाबळेश्वरमधील दाखल झालेले पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

नवजा येथील ओझर्डे धबधबा वाहू लागला…

पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा धुक्यात हरवलेला नवजा येथील प्रसिध्द ओझर्डे धबधबा सह्याद्रीच्या कुशीतून फेसाळत वाहू लागला आहे. त्यामुळे आतापासूनच पर्यटकांची पावले या वळू लागली आहेत, तर संततधार पावसामुळे कोयनानगर परिसरने हिरवी चादर परिधान केल्याने कोयनेचा निसर्ग पर्यटकांना खुणावू लागला आहे.

कोयना विभाग पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज

सह्याद्रीच्या कडेकपारीतून उंचावरून फेसाळत कोसळणारे लहान-मोठे फवारे, चारी बाजूनी हिरवीगार झाडी व जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट, अशा निसर्ग सौंदर्याचा वरदान लागलेला कोयना विभाग पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोयना भाग जून महिन्यात पडणार्‍या पावसामुळे पावसाच्या सरीने सदाहरित असलेला डोंगरकपारी सह परिसरात गर्द हिरवळीचा गालीचा व दाट धुक्याची दुलई पावसाच्या सरी अशा आल्हाददायक वातावरणात सह्याद्रीच्या रांगामधून पाटणच्या पश्चिमे कडील कुंभाली घाटापर्यंत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वाहणार्‍या जलधारा पावसाळ्यात पर्यटकांना खुणावत असतात.