उपमुख्यमंत्री शिंदेंनी दरे गावातल्या शेतात यंदा केली आवाकाडोची लागवड

0
31
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी मुक्कामी असून ते दरवर्षी आपल्या सहकाऱ्यांसोबत एका तरी नव्या झाडाची लागवड करतात. यंदा पहिल्यांदाच आवाकाडो या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या आवाकाडो फळाची लागवड करून हा प्रयोग यशस्वी झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांनाही पर्यायी जोड पीक म्हणून आवाकाडोची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात हा प्रयोग केला.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत दरे गावातील ग्रामस्थ आणि शिंदे यांचे सर्व सहकारी आवर्जून उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीच्या पट्ट्यातील दरे गावचा परिसरातील माती ही अत्यंत सुपीक असून त्यात कोणतेही पीक घेतले तरी ते उत्तमरीत्या येते असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

या ठिकाणी केलेला आवाकाडो लागवडीचा हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल याची खात्री उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तसे झाल्यास स्ट्रॉबेरी, ब्लु-बेरी अशा बेरीवर्गीय वनस्पतींची लागवड करणाऱ्या या पट्यात शेतकऱ्यांना आवाकाडो लागवडीतून नवीन नगदी उत्पन्न देणारे आणखी एक पीक सापडेल असा त्याना विश्वास आहे. त्यामुळेच हा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या शेतात केला आहे.