सातारा जिल्ह्यातील 45 गावे, 298 वाड्यांना टँकरने पाणी

0
1377
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागल्याने भूजलपातळीत घट झाली आहे. तसेच पाण्याचे नैसर्गिक स्त्रोतही आटू लागल्याने जिल्ह्यात टंचाईचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील 45 गावे व 298 वाड्या तहानलेल्या आहेत. 69 हजार 872 नागरिक व 42 हजार 747 जनावरांना 55 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एप्रिल महिन्यातच इतक्या टँकरने पाणी दिले जात असताना मे महिन्यात भीषणता आणखी वाढणार आहे.

सातारा जिल्ह्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईच्या संकटाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची मागणी वाढली असल्याने टंचाईग्रस्त भागात प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. मे महिन्यात उन्हाची दाहकता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकरची मागणी वाढल्यास प्रशासनाला पाण्यासाठी आणखी जादा टैंकर पुरवावे लागणार आहेत.

माण तालुक्यातील बिजवडी, पांगरी, येळेवाडी, पाचवड, राजवडी, जाधववाडी, वडगाव, मोगराळे, मोही, डंगीरेवाडी, थदाळे, वावरहिरे, अनभुलेवाडी, दानवलेवाडी, हस्तनपूर, सोकासन, धुळदेव, बरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, भाटकी, संभुखेड, खडकी, रांजणी, जाशी, पळशी, मार्डी, खुटबाव, पर्यंती, इंजबाव, भालवडी, पानवण, विरळी, वारूगड, कुळकजाई, टाकेवाडी, उकिर्डे, कोळेवाडी, परकंदी, आंधळी, महिमानगड, दोरगेवाडी यांसह 24 गावे व 291 वाड्यांना 47 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पाटण तालुक्यातील जाधववाडी, जंगलवाडी, शिदुकवाडी (बरची, खळे) शिदू कवाडी (काढणे), भोसगाव (आंबुळकरवाडी), चव्हाणवाडी नाणेगाव असे 1 गाव, 4 वाड्यांना 4 टँकरने पाणी दिले जात आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव अंतर्गत गडगेवाडी, बालेघर अंतर्गत कासुर्डेवाडी, अनपटवाडी अशा 1 गाव 3 वाड्यांना 3 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्यातील भंडारमाचीलाही टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.