सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४५ गावे, २९८ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माण तालुक्यानंतर आता पाटण, वाई, कोरेगाव तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. माण तालुक्यात सर्वाधिक ४२ गावे व २९१ वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल जाणवू लागल्याने प्रशासनाने टंचाईसदृश गावांमध्ये उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रारंभी माण तालुक्याच्या बहुतांश भागांत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने गतीने कार्यवाही करत ४२ गावे व २९१ वाड्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. या पाण्यावर ६५ हजार १५२ लोकसंख्या व ४० हजार २७० पशुधन अवलंबून आहे.
शासकीय पाच आणि खासगी ४२ अशा ४७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात ११ विहिरी व सहा बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. पाटण तालुक्यात एक गाव व चार वाड्यांना चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर एक हजार ५८६ लोकसंख्या व ९८७ पशुधन अवलंबून आहे. वाई तालुक्यात एक गाव व तीन वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा होत असून, दोन हजार ४२८ लोकसंख्या व ७५५ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे. कोरेगाव तालुक्यात एका गावात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, ७०६ लोकसंख्या व ७३५ पशुधन या पाण्यावर अवलंबून आहे.