कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील तासवडे येथील एमआयडीसीमध्ये बंदी असणार्या प्लास्टिकच्या पिशव्या, पत्रावळी, द्रोण आणि पाण्याचे ग्लास बनवणार्या दोन कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने छापा टाकत धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल पाच टन प्लास्टिकसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. दोन्ही कंपन्यांवर कारवाई करण्याबरोबरच त्यांच्यावर उत्पादनासाठी कायमची बंदी घालण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तासवडे एमआयडीसीमध्ये सुमित घोलप (रा. घोलपवाडी, ता. कराड) आणि सर्जेराव साळुंखे (रा. उब्रंज, ता. कराड) या दोन उद्योजकांच्या कंपन्या असून, त्या अनेक दिवसांपासून बंद होत्या. दोन्ही कंपन्यांचे मुख्य प्रवेशद्वारही बंद होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून आत चोरीछुपे उत्पादन सुरू होते. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार आणि उद्योजक यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. बुधवारी दुपारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते आणि क्षेत्रीय अधिकारी अर्चना जगदाळे यांच्या पथकाने तासवडे एमआयडीसीमधील सुमित घोलप यांच्या कंपनीवर छापा टाकला. यावेळी त्यांना बंदी असणार्या प्लास्टिकच्या पिशव्यांचे उत्पादन घेतले जात असल्याचे निदर्शनास आले . तेथे तीन मशिनरीवर चार कामगार प्लॅस्टिकच्या पिशव्या बनवण्याचे काम करत होते. त्यामुळे अमोल सातपुते आणि त्यांच्या पथकाने या कंपनीवर कारवाई करत बंदी असणार्या तयार प्लास्टिक पिशव्यांसह तब्बल साडेचार टन प्लास्टिक जप्त केले आहे.
यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने संपूर्ण एमआयडीसी परिसरातील कंपन्यांची झाडाझडती घेतली. यावेळी सर्जेराव साळुंखे यांनीही बंदी असणार्या प्लास्टिक पत्रावळी, द्रोण आणि प्लास्टिकचे ग्लास यांचे उत्पादन घेत असल्याचे पथकास निदर्शनास आले. त्यांमुळे साळुंखे यांच्या कंपनीवरही प्रदूषण मंडळाने नियमाप्रमाणे कारवाई केली आहे .या दोन्ही कारवाई मध्ये तब्बल पाच टन तयार मालासह कच्चे प्लास्टिक जप्त केले आहे.