कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील उंडाळे शेवाळेवाडी येथे रविवारी दिवसभर बिबट्याने धुमाकूळ घालत पाच ते सहा दुचाकींचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या शेळकेवाडी येथील मुलीवर बिबट्याने झेप टाकत हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.
बिबट्याच्या धुमाकुळामुळे शेवाळेवाडी, उंडाळे, सवादे, बांदेकरवाडी, म्हासोली येथील ग्रामस्थ भीतीने गांगारून गेले आहेत. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी अनेकदा मागणीही केली आहे. परंतु, वन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमधून संतप्त भावना निर्माण होत आहेत.
रविवार, दि.13 रोजी बिबट्याकडून वाहनांचा पाठलागाचे सत्र दिवसभर सुरू होते. सोमवार, दि. 14 एप्रिल रोजी उंडाळे, शेवाळेवाडी येथे बिबट्याने पहाटे सदाशिव शेवाळे यांच्या घरात शिरून त्यांचे पाळीव कुत्रे फस्त केले. उंडाळे, शेवाळवाडीदरम्यान असलेल्या रस्त्याच्या कडेला वस्तीजवळ लपून बसत या परिसरातून जाणार्या चार ते पाच दुचाकींचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ले केले. यावेळी शेळकेवाडी येथील दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या लहान मुलीवर झेप टाकली. बिबट्याची नखे लागल्याने मुलगी जखमी झाली आहे.
सोमवारी दिवसभर बिबट्याने सदाशिव शेवाळे यांचे घर टार्गेट केले. सायंकाळी त्यांच्या घरात पुन्हा प्रवेश करून दारात बांधलेली शेळी ठार केली. गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या सातत्याने शेवाळेवाडी परिसरात जनावर हल्ले करणे, पाळीव भटकी कुत्र्यांवर हल्ला करून ती फस्त करणे हा नित्यक्रम सुरू आहे. बिबट्याच्या सातत्याच्या हल्ल्याने व दर्शनाने शेतकरी वर्ग पुरता धास्तावला आहे.