सातारा प्रतिनिधी | सातारा पोवई नाका येथील भाजी मंडईत शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गुंडांच्या जागेवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उभारल्याने संतापलेल्या एक तरुणाने थेट पोलिसांसमोरच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणी धमकी देणाऱ्या ट्रान्स अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी राजू शेळके यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर रोहित जगन्नाथ नाईक (वय २९, रा. खेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोवई नाका येथील भाजी मंडई मध्ये शेतकऱ्यांना पालिकेच्या वतीने दोन लाईन आरक्षित करण्यात आल्या आहेत. यावर काही गुंडांनी अतिक्रमण केल्याची माहिती शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे दिली होती.
त्यानुसार राजू शेळके यांनी पालिकेकडे तक्रार दिल्यानंतर पालिकेचा अतिक्रमण विभाग तसेच पोलिसांसह या ठिकाणी हे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या राजू शेळके यांनाच संबंधित गुंडाकडून जीवे मारण्याची व कापून टाकण्याची धमकी देण्यात आली. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर सुरू असतानाही पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या प्रकारामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.
आपलाच भाजीपाला विकण्यासाठी शेतकऱ्यांना गावगुंडांना हप्ते द्यावे लागतायत : राजू शेळके
सातारा शहरांमध्ये परिसरातील शेतकरी आपला भाजीपाला घेऊन विक्रीसाठी भाजी मंडई मध्ये येत असतात. त्यांना भाजी विक्रीतून चार पैसे मिळतात. मात्र, शहरात त्यांना काही गाव गुंडाच्या त्रासाला सामोरे जावे लागते. गाव गुंडांकडून शेतकरी शहरातील भाजी मंडई तसेच इतर ठिकाणी बसण्यासाठी पैशांची मागणी करत असल्याचे प्रकार ऐकायला मिळत आहेत. आजचे सरकार, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस काय करत आहेत? खेडेगावातील शेतकऱ्यांना आज शहरात येऊन आपला भाजीपाला गाव गुंडाणा पैसे, हप्ते देऊन भाजी विक्रीसाठी जागा घ्यावी लागत असेल तर काय करायचे? असा सवाल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना उपस्थित केला आहे.