पहिल्या मानाच्या निनाम पाडळीच्या सासनकाठीला 3 लाखांचे रेशमी वस्त्र

0
745
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेत पहिला मान असलेल्या सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी या गावातील सासनकाठीसाठी तीन लाख रुपये किमतीचे रेशमी वस्त्र तयार करण्यात आले आहे. अस्सल रेशमी वस्त्राने सजवण्यात आलेली ही मानाची सासनकाठी यंदाच्या यात्रेत आकर्षण ठरेल. येत्या दोन दिवसांत या मानाच्या सासनकाठीचे आगमन होणार आहे.

जोतिबा चैत्र यात्रा शनिवारी (दि. 12) होत आहे. यात्रेसाठी सासनकाठ्यांसह भाविक जोतिबा डोंगरावर येत आहेत. 108 मानाच्या सासनकाठ्यांसह अन्य सासनकाठ्या यामध्ये सहभागी होतात. पालखी मिरवणुकीत पहिला मान हा सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी या गावच्या सासनकाठीला आहे.

या सासनकाठीसाठी येवला (नाशिक) येथील नामांकित बाजारपेठेमधून कच्चे रेशीम खरेदी करून त्याचे धागे बनवण्यात आले आहेत. हे धागे पांढर्‍या आणि गडद गुलाबी रंगात रंगवले आहेत. शास्त्रीय पद्धतीने, हातावर चालणार्‍या लूमच्या साहाय्याने रेशमाचे कापड विणण्यात आले आहे. या वस्त्रापासून सासनकाठी सजवण्यात आली आहे. यासाठी तीन लाख रुपयांचा खर्च आला आहे. हे रेशमी वस्त्र तयार करण्याचे काम पाडळीतील पारंपरिक शिंपी समाजाने केले आहे.