सातारा प्रतिनिधी | साताऱ्याच्या औद्योगिक भविष्याची दिशा आता बदलणार आहे. राज्य सरकारने आयटी पार्क उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सातारा तालुक्यातील नागेवाडी येथील ४२ हेक्टर जागा आयटी पार्कसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. या निर्णयामुळे साताऱ्याच्या विकासाची गती आणखी वेगवान होणार असून, जिल्ह्यातील उच्चशिक्षित युवकांच्या रोजगाराच्या संधींमध्येही मोठा बदल होईल.
गेल्या अनेक वर्षांपासून सातारकरांच्या मनात ठरलेली एकच अपेक्षा, “आयटी पार्क”, आता प्रत्यक्षात उतरण्यास सुरूवात झाली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत साताऱ्याचा औद्योगिक विकास कमी झाला होता, त्यामुळे येथील युवकांना नोकरीच्या शोधात इतर मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागले होते. यावर एक तोडगा काढण्यासाठी आयटी पार्क सुरू करण्याची योजना खूप आधीपासूनच राबविण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु आता यावर खरी कामे सुरू झाली आहेत.
उद्योजकांसाठी सोयीस्कर, विकासासाठी सुलभ
आयटी पार्कसाठी ४२ हेक्टर सरकारी जमीन देण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. औद्योगिक विकास महामंडळाने त्वरित प्रक्रिया सुरू केली असून, यासाठी आवश्यक सर्व सुविधांचे नियोजन केले जात आहे. याशिवाय, मुंबई ते कोल्हापूर महामार्गावर असलेला सातारा जिल्हा उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे देशभरातून आयटी कंपन्यांसाठी हा एक आकर्षक डेस्टिनेशन ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांत साताऱ्यातील युवकांनी आयटी क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये शिकली आहेत, पण त्यांना पुणे, बंगळूर, हैदराबाद अशा मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होऊन रोजगार मिळवावा लागतो आहे. आता आयटी पार्कच्या माध्यमातून या युवकांना साताऱ्याच्याच भूमीवर संधी मिळणार आहे.
साताऱ्यातील औद्योगिक विस्ताराची नवी दिशा
औद्योगिक विकासाच्या दृष्टीनेही सातारा एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉइंट गाठत आहे. २३ मार्च रोजी उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या बैठकीत या निर्णयावर ठराव झाला. लवकरच साताऱ्यात स्थल पाहणी आणि प्रक्रिया सुरू होईल, ज्यामुळे औद्योगिक विकासाचे नवे पर्व सुरू होईल.
प्रादेशिक कार्यालये – सुविधा आणि गती
साताऱ्यात औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय सध्या कार्यरत झाले आहे. त्यामुळे उद्योजकांना आणि नागरिकांना महत्त्वाच्या कामांसाठी कोल्हापूरला जाण्याची आवश्यकता राहिली नाही. यामुळे भूखंड संपादन, वाटप आणि इतर औद्योगिक प्रक्रियांसाठी गती मिळाली आहे. साताऱ्यात सुरू होणारे आयटी पार्क आणि औद्योगिक क्षेत्रातील या महत्वाच्या घडामोडी साताऱ्याला एक नव्या औद्योगिक युगात प्रवेश करण्यास मदत करतील.