सातारा प्रतिनिधी | श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 19 जुन ते दि. 21 जुलै या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने पालखी मुक्कामी असणाऱ्या पालखीतळांची पाहणी करण्यात येत आहे. प्रशासनाशी सुसंवाद साधत पालखी सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी यासोबतच पालखीतळावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्सव समितीचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या शिष्टमंडळाने पाहणी केली.
फलटण तालुक्यातील तरडगाव, फलटण व बरड पालखीतळाची पाहणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आली. यावेळी फलटणच्या प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्या वतीने पालखी सोहळा समितीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी रामभाऊ चोपदार व इतर विश्वस्त, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव अहिवळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. फलटण येथे सुसज्ज असा पालखी तळ आहे. फलटणच्या पालखीतळावर सर्व पालखी सोहळ्याचे योग्य ते नियोजन प्रतिवर्षी करण्यात येते. यामध्ये कोणतीही कमतरता पडणार नाही, याची दक्षता प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात यावी, असे निर्देश प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी दिले.