सातारा प्रतिनिधी | शासनाकडे प्रलंबित असणाऱ्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी १ मेपासून आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची बैठक नुकतीच जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात पार पडली. या बैठकीदरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात दुकानदारांच्या धान्य वाटप कमिशनमध्ये वाढ करावी, धान्य वाटपासाठीच्या सव्र्व्हर यंत्रणेत आवश्यक ती सुधारणा करावी, धान्य उचलीदरम्यान होणारी वजनाची तूट टाळावी, दुकानदारांविरोधात निनावी तक्रार आल्यास त्याची चौकशी करू नये, ई. केवायसीसाठीच्या कामास मुदतवाढ द्यावी, गरजू ग्राहकांना योजना लाभ देण्यासाठीचा इष्टांक वाढवून द्यावा,
कमिशनअभावी दुकानदारांची झालेली आर्थिक कोंडी दूर करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्यांचा विचार सहानुभूतिपूर्वक न झाल्यास ता. १ मेपासून आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे. हे निवेदन बैठकीच्या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना देण्यात आले.