कराड प्रतिनिधी । देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र कराड तालुक्यातील गोळेश्वर या त्यांच्या गावी उभारण्यात येत असून, जागेचा प्रश्न न सुटल्याने शासनाने निधी देऊनही कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभे राहिले नाही. या ठिकाणी इतर अतिक्रमण करण्यात आल्याचे सांगत प्रशासनाने गुरुवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात येथील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर काही वेळातच ही मोहीम थांबविण्यात आली.
यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्यासह सर्वच विभागांचे वरिष्ठ अधिकारी स्वतः त्याठिकाणी उपस्थित होते. देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र जागेचा प्रश्न न सुटल्याने शासनाने निधी देऊनही कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभे राहिले नाही. या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले असून त्या जागेत ज्यांची घरे आहेत, ते सातबाऱ्यावर आपली नावे असल्याचे सांगत आहेत. अशातच प्रशासनाने गुरुवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात येथील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, संबंधित जागेवर ज्यांची घरे आहेत अशा घरमालकांनी न्यायालयात दाद मागून न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मिळवली. स्थगितीचा आदेश प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर काही वेळातच अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात आली. गोळेश्वर गावचे सुपुत्र पैलवान खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी येथे सन १९५२ साली ऑलिम्पिकमध्ये स्वातंत्र्यानंतर देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवून दिले होते.