कराड प्रतिनिधी | दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दोषी धरून न्यायालयाने वीस वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली. कराड येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. के. एस. होरे यांनी गुरुवारी ही शिक्षा सुनावली.
बापू ऊर्फ नितीन रमेश पाटोळे (वय ३०), असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सरकार पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी १५ नोव्हेंबर २०२३ रोजी घराबाहेर खेळत असताना आरोपी बापू ऊर्फ नितीन याने त्या मुलीला आपण दोघे घरात खेळू, असे म्हणून आपल्यासोबत घरी नेले. खेळण्याचा बहाणा करीत त्याने अत्याचार केला. कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलीने कोठेही वाच्यता केली नाही. मात्र, त्यानंतर २३ फेब्रुवारी २०२४ रोजी मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने पुन्हा त्या मुलीला आपल्यासोबत घरी नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घाबरलेली मुलगी आपल्या घरी पळून गेली.
घरात गेल्यानंतर तिने ही घटना आईला सांगितली. याबाबत आरोपी बापू ऊर्फ नितीन पाटोळे याच्यावर कहऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. तत्कालीन महिला सहायक पोलिस निरीक्षक एस. व्ही. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील आर. सी. शहा यांनी काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्या. के. एस. होरे यांनी आरोपीला या गुन्ह्यात दोषी धरून वीस वर्षे सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.