सातारा प्रतिनिधी | खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन, त्यांना मागण्यांचे निवेदन दिले, तसेच विविध विषयांवर चर्चाही केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींची जीभ छाटण्याची धमक आमच्यासह शिवप्रेमींमध्ये निश्चित आहे; परंतु आम्ही संयम राखून आहोत. केंद्र व राज्य शासनाने अशा प्रवृत्तींना धडकी भरवणारा मकोका, टाडासारखा अजामीनपात्र आणि दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा असलेला विशेष कायदा पारित करावा, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी केली.
निवेदनात नमूद केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभावाचा विचार देत स्वराज्याची स्थापना केली; परंतु काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छ पद्धतीने छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा अवमान होईल, असे भाष्य किंवा कृती करतात. यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळून, समाजामध्ये दुफळी पसरते.
राज्य शासनाने तज्ज्ञांशी विचारविमर्श करून, ऐतिहासिक दस्तावेजांचा योग्य अर्थ लावून, यापूर्वीच शिवछत्रपतींसह मराठा साम्राज्याचा शासनमान्य साधार इतिहास प्रसिद्ध करणे गरजेचे होते. आज विकृत प्रवृत्ती असलेली व्यक्ती चुकीच्या पद्धतीने इतिहासातील प्रसंगाचे वर्णन करून अकारण विवाद निर्माण करीत आहेत. आमच्या संयमाचा कडेलोट होण्यापूर्वी राज्य व केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि एकंदरीत मराठा साम्राज्याचा इतिहास अधिकृतपणे प्रसिद्ध करावा, त्याचबरोबरीने अशा प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई करता येणारा, तसेच किमान दहा वर्षांची शिक्षा असणारा अजामीनपात्र विशेष कायदा पारित करावा. यावेळी काका धुमाळ, ॲड. विनीत पाटील, कुलदीपअण्णा क्षीरसागर, करण यादव उपस्थित होते.
निवेदनातील प्रमुख मागण्या..
१) ऐतिहासिक घटनांचे चित्रपट, मालिका आदींचे चित्रीकरणापूर्वी सेन्सॉर बोर्डाला सहाय्यभूत असलेली, इतिहासकार, संशोधक आणि इतिहासतज्ज्ञांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करावी, कमिटीच्या शिफारशी विचारात घेऊन सेन्सॉरशिप देण्यात यावी.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची प्रचीती देणारे राष्ट्रीय स्मारक नवी दिल्ली येथे उभारावे.
२) छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांची समाधी कर्नाटक राज्यात आहे. ही समाधी व परिसराचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने भरीव निधी उपलब्ध करावा.
३) पहिल्या टप्प्यात राजगड, रायगड, अजिंक्यतारा व दुसऱ्या टप्यात राजधानी जिंजी (कर्नाटक), पानिपत, आग्रा, इंदूर, ग्वालियर, तंजावर, यासह अन्य गड-किल्ल्यांच्या विकासाचे धोरण आखावे.