सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर तालुक्यातील प्रस्तावित सोळशी धरणातून वसना उपसा जलसिंचन योजनेला पाणी मिळाल्यास कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील वंचित गावांचा शेतीचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे कोरेगावच्या उत्तर भागाला सोळशी धरणातून पाणी द्यावे, अशी मागणी सोळशी धरण पाणीवाटप संघर्ष समितीमार्फत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पाण्याबाबत चर्चा केली. यावेळी अशोकराव लेंभे, सुधीर साळुंखे, विकास लेंभे, माधव पुरी, नारायण सावंत, जितेंद्र जगताप, आदिनाथ सावंत, संदीप धुमाळ, साळुंखे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेवेळी निंबाळकर यांनी नांदवळ लघुपाटबंधारे १ प्रकल्पाच्या कालव्यांचे नलिकेत रूपांतर करण्याच्या सात कोटी २५ लक्ष ५१ हजारांच्या अंदाजपत्रकाला १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मंजुरी मिळाली आहे अशी माहिती दिली. महाबळेश्वर तालुक्यातील प्रस्तावित सोळशी धरणाला ३० सप्टेंबर २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते पाणी बोगद्यातून थोम प्रकल्पात आणून उत्तर कोरेगावच्या २६ गावांसाठी राखून ठेवण्यात यावे.
सोनके, मोरबेंद, करंजखोप, अरबवाडी, नांदवळ, रणदुल्लाबाद व सर्कलवाडी या सात गावांच्या अंदाजे २८५० हेक्टर उर्वरित वंचित क्षेत्राकरिता ०.५२ अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी मंजूर झाले आहे. वसना योजनेमध्ये जगतापनगर, सोळशी, पिंपोडे बुद्रुक, भावेनगर, तडवळे, वाठार, घिगेवाडी, दहिगाव, तळीये, विखळे, फडतरवाडी, जाधववाडी, नलावडेवाडी, विचुकले, गुजरवाडी, देऊर, पळशी, कोलवडी ही १९ गावे समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. या गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
२६ वंचित गावांची २६ एप्रिलमध्ये गावांची पाणी परिषद
प्रस्तावित सोळशी प्रकल्पाचे तीन पाणी बोगद्यातून धोम प्रकल्पात व पुढे वसना योजनेतून नांदवळ लघुपाटबंधारे प्रकल्पापर्यंत पोहोचेल. तेथून बंदिस्त कालव्याद्वारे पिंपोडे बुद्रुकमधील कोट्याच्या तलावात नेण्यात येईल. त्यामुळे नदीच्या पूर्वेकडील वंचित गावांना पाणी देणे शक्य आहे. त्याकरिता एप्रिलमध्ये २६ वंचित गावांची २६ एप्रिलमध्ये गावांची पाणी परिषद घेण्यात येणार आहे.