सातारा प्रतिनिधी । सातारा रेल्वे स्टेशनवर पिट लाईन आणि रेल्वे गाडयांमध्ये पाणी भरण्याची आणि देखभाल सुविधा निर्माण करावी, डूरांतो, झेलम आणि आझाद हिंद एक्स्प्रेस यांचे विस्तारिकरण करुन आगमन आणि निर्गमन सातारा रेल्वेस्थानकावरुन करावे या रेल्वेसंबंधी प्रमुख मागण्यांसह सातारा आकाशवाणी संदर्भात कृतीबंधानुसार कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय माहिती-नभोवाणी तथा रेल्वे मंत्री ना.अश्विनी वैष्णव यांचेकडे केली.
साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच केंद्रीय माहिती-नभोवाणी तथा रेल्वे मंत्री ना.अश्विनी वैष्णव याची भेट घेतली. यावेळी काका धुमाळ, ॲड.विनीत पाटील, करण यादव उपस्थित होते. यावेळी त्यांनी मंत्री वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे महत्वाच्या मागण्या केल्या. सातारा जिल्ह्यातील रेल्वे संदर्भात खा. उदयनराजे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा स्थानकाजवळ रेल्वेची मुबलक जागा उपलब्ध आहे. याठिकाणी पिट लेन तयार करणे, देखभाल दुरुस्तीची सुविधा निर्माण करणे आणि रेल्वेगाडयांसाठी पाणी भरण्याची सुविधा निर्माण करुन, पुणे रेल्वेस्टेशन हे आगमनचे अंतिमस्थान आणि निर्गमनचे पहिले स्थान असलेल्या झेलम, आझादहिंद, डूरोंतो या गाडयांचा विस्तार सातारा पर्यंत करावा, यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच पुणे जंक्शनवरील गाडयांची गर्दी आणि ताण कमी होण्याबरोबरच सातारा उत्तर भारतासह महत्वाच्या ठिकाणी जोडला जाईल.
या गाड्या विस्तारित केल्यास, रेल्वे प्रवाश्यांकरीता विशेष करुन सशस्त्र सेनादल, अर्धसेनादलातील सन्माननीय जवांनाकरीता एक चांगली सुविधा निर्माण होईल. त्याचप्रमाणे बेळगांव किंवा कोल्हापूर येथुन पुण्याला जाणारी व येणारी इंटरसिटी रेल्वे किंवा जनशताब्दी रेल्वे सुरु करावी. ही रेल्वे साधारणपणे बेळगावरुन पहाटे 5 वांजता किंवा कोल्हापूरवरुन सकाळी 6.30 वाजता सुटावी आणि पुण्यावरुन सायंकाळी कोल्हापूर/बेळगांवकडे जाणारी असावी. तसेच ट्रेन क्र. 12629/12630 यशवंतपूर संपर्क क्रांति एक्स्प्रेस, 22685/22686 कर्नाटक संपर्क क्रांति एक्स्प्रेस आणि 19667/19668 म्हैसूर हमसफर एक्सप्रेस या गाडयांचा थांबा सातारा रेल्वेस्थानकावर मंजूर करावा तसेच उन्हाळयातील विशेष रेल्वे ट्रेन क्र.06533/06534 म्हैसूर भगत कि कोठी एक्स्प्रेस आणि एसएमव्हीबीजीकेपी ट्रेन नं.06529/06530 या दोन्ही गाडयांना सातारा थांबा मंजूर करावा. ट्रेन नंबर 11023/11024 सहयाद्री एक्सप्रेस बंद करण्यात आली आहे ती पुन्हा सुरु करावी.
पश्चिम महाराष्ट्रातुन सहयाद्री एक्स्प्रेसने प्रवास करणा-या प्रवाश्यांची संख्या मोठी आहे तथापि त्या जागेवर कोल्हापूर पुणे नवी गाडी सुरु करण्यात आली आहे. सदरची रेल्वे मुंबईपर्यंत विस्तारित करण्यात यावी. लोणंद रेल्वेस्टेशनाच्या विकासाबरोबरच दर्शन एक्स्प्रेस, पूर्णा एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस, कोल्हापूर अहमदाबाद एक्स्प्रेस, एर्नाकुलम एक्सप्रेस, महालक्ष्मी एकस्प्रेस, दादर-हुबळी एक्स्प्रेस या प्रमुख रेल्वेगाडयांचे थांबे लोणंदा असणे गरजेचे आहे. हे थांबे मंजूर झाल्यास, लोणंदसह लगतच्या सोलापूर,पुणे जिल्हयातील तालुक्याच्या प्रवाश्यांची आणि जवानांची चांगली सोय होणार आहे.
दरम्यान, सातारच्या आकाशवाणी केंद्राच्या ब-याच समस्या असून, या समस्या तातडीने सोडवणे आवश्यक आहे. आकाशवाणी सातारा केंद्रामधुन अनेक कुटुंबाना विविध माहित्या, प्रबोधन आणि निखळ करमणुक होत आहे. 103 मोगाहर्टस हे सातारा आकाशवाणी केंद्राचे लोकेशन सातारा जिल्हावासियांमध्ये लोकप्रिय झाले आहे. गेल्या 32 वर्षापासूनचे असलेल्या आकाशवाणी केंद्राला आजरोजी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. याठिकाणी फक्त दोन कार्यक्रम/प्रसारण अधिकारी आहेत त्यापैकी एक अधिकारी तसेच चार इंजिनिअर्स हे सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहे. आकाशवाणी सातारा केंद्रामध्ये मंजूर आकृतीबंधानुसार 40 कर्मचारी असणे आवश्यक आहेत तथापि आज रोजी येथे फक्त 14 कर्मचारी कार्यरत आहेत. आकाशवाणी केंद्राची सध्या असलेली प्रसारण यंत्रणा ही सुमारे 32 वर्षांची जुनी आहे. ही यंत्रणा आणि आवश्यक उपकरणे, यत्रे तातडीने बदलणे केंद्राची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.