कराड प्रतिनिधी । यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचे उमेदवार तथा माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती. यावर मुंबईत उच्च न्यायालयात बुधवारी अंतिम सुनावणी पार पडली. त्याचा आज अंतिम निकाल जाहीर होणार आहे. याबाबत निवासराव थोरात यांनी प्रतिक्रिया दिली असून मला खात्री आहे कि या उच्च न्यायालयालयाच्या लढाईत मला नक्कीच यश मिळेल, विजयी होईन आणि परत लवकर येईन, असे म्हटले आहे.
मुंबईत उच्च न्यायालयाच्या सुनावणीसाठी हजर राहिलेले स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचे उमेदवार तथा माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांच्याशी ‘हॅलो महाराष्ट्र’ ने संवाद साधला. यावेळी थोरात म्हणाले की, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून माझ्यापाठीमागे काही लोक पूर्व नियोजन करून माझा अर्ज कशा प्रकारे अवैध किंवा बाद होईल याच्या प्रयत्नात होते.अर्ज छाननीमध्ये माझा उमेदवारी अर्ज पूर्ण तयारीने बाद करण्यात आला आणि तो अर्ज बाद केल्यानंतर मला अपील करावे लागले व पुढे सुनावणीसाठी जावे लागले. यामध्ये सात ते आठ दिवस गेले.
पण मी मागे हटलो नाही. मी लढलो आणि मला या न्यायालयीन लढाईत यश आले व माझा अर्ज वैध ठरवण्यात आला. त्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पार पडली व चिन्हाचे वाटप झाले. चिन्ह वाटपामध्ये आपल्या पॅनेलला विमान हे चिन्ह मिळाले. मी माध्यमांच्या समोर जाऊन त्यांच्यापुढे जाऊन वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर मला मुंबईत उच्च न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहावे लागत आहे.
मी मुंबईत काल बुधवारी सुनावणीसाठी हजर राहिलो असून आमचे म्हणणे दिवसभर पार पडलेल्या सुनावणीत सादर केले आहे. न्यायालयाकडून काल सुनावणी घेण्यात आल्यानंतर आज सुपारी पुन्हा सुनावणी घेऊन अंतिम निर्णय दिला जाईल. मला खात्री आहे कि मी हि न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकेन व लवकरच आपल्यासोबत प्रचारात सहभागी होईन, अशी प्रतिक्रिया स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवासराव थोरात यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.
मुंबईत सुनावणीत नेमकं काय घडलं?
स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचे प्रमुख व उमेदवार प्रमुख निवास थोरात यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीबाबत मंगळवार आणि बुधवारी दोन दिवस मुंबईत उच्च न्यायालयात सुनावणी पार पाडली. सुनावणीवेळी दोन्ही बाजूकडील वकिलांनी आपापली बाजू मांडली. न्यायालयाने आज दुपारी तीन वाजता पुन्हा निर्णय देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नेमकं काय आहे न्यायालयीन प्रकरण?
सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत तब्बल २५१ जणांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेनंतर २०५ अर्ज उरले होते; पण अवैध झालेल्या उमेदवारांपैकी १० जणांनी प्रादेशिक संचालक पुणे यांच्याकडे अपील केले होते. त्यात १० पैकी ९ जणांचे अर्ज पुन्हा वैध करण्यात आले. याप्रकरणी न्यायालयाने पहिली तारीख शुक्रवार, दि. २१ या दिवशी दिली होती; पण त्या दिवशी निवास थोरात हजर न राहिल्याने मंगळवार, दि. २५ ही पुढची तारीख देण्यात आली होती. मंगळवारी उच्च न्यायालयात निवासराव थोरात यांनी उपस्थित राहून वकिलामार्फत आपले म्हणणे सादर केले.