CM फडणवीसांना रोहित पवारांचं थेट आव्हान; म्हणाले, एवढे पुरावे आहेत की गोरेंचा राजीनामा होणारचं!

0
1546
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधानसभेच्या अधिवेशनात काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेने केलेल्या आरोपांच्या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप केले. त्यांच्या आरोपांनंतर आमदार रोहित पवार आक्रमक झाले. “मुख्यमंत्र्यांनी माझे आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले, परंतु आम्हाला प्रत्युत्तर देण्याची संधी नाकारली गेली.” मात्र, जयकुमार गोरे यांच्या विरोधात एवढे पुरावे आहे की त्यांचा राजीनामा घेतलाच जाईल, असे आव्हान पवार यांनी यावेळी दिले.

आज आमदार रोहित पवार यांनी मुंबईत विधिमंडल परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार केला. यावेळी पवार यांनी गोरे यांच्याविरोधात “एक गठ्ठा पुरावे” असल्याचा दावा केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी पवार म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी माझे आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले, परंतु आम्हाला प्रत्युत्तर देण्याची संधी नाकारली गेली.

जेव्हा महिलेचा विषय आमच्याकडे आला तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की, त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे. तसेच पत्रकारालाही न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही एक किंवा दोन फोन केले असतील. पण शंभर ते दोनशे फोन केले गेले नाहीत. आता तेथे कारवाई सुरू आहे. पण हा विषय फक्त पारदर्शकपणे हाताळायला हवा. मात्र, पीडित महिलेला सापळा रचून एक कोटींच्या खंडणीत अडकवण्यात आलं आहे.

अरुण देवकर नावाचा पीआय आहे, त्याने पैसे ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. देहव्यापाराचे आरोप या पीआयवर आहेत. दुर्दैवाने त्या महिलेचा वकिल मॅनेज झाला. त्या वकिलाने फीचे पैसे घेऊन बोलावून तिथे देवकरने लावलेल्या ट्रॅपमध्ये महिलेला अडकवले. त्या पीडित महिलेला मी किंवा सुप्रीया सुळे यांनीही फोन केला नाही, असे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिले.

एक कोटी रुपये कॅश कुठून आली?

एक कोटी रुपयांची लाच घेताना पीडितेला पकडण्यात आले आहे, हे एक कोटी रुपये कॅश कुठून आली?, कोणी आणली?, एवढी मोठी रोख रक्कम घेऊन येणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत का? ते मंत्र्यांचे मित्र आहेत म्हणून त्यांना सोडून दिले जाणार असाही टोला यावेळी रोहित पवार यांनी लगावला.

आम्हाला हक्कभंग आणू दया, पुराव्यांचा गठ्ठे मुख्यमंत्र्यांना आणून देऊ

तुषार खरात नावाच्या पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोप झाले. का तर त्याने यांच्या (जयकुमार गोरे) विरोधात बातम्या केल्या. यांनी (जयकुमार गोरे) मृत व्यक्तीची नावाने असलेली जमीनी लाटल्या, पैसे खालले याच्या बातम्या त्याने केल्या. ते मंत्री असल्याने त्यांचा हक्कभंग स्वीकारला जातो, मात्र आम्हाला हक्कभंग आणू देत नाही. आम्हाला हक्कभंग आणू दया. आम्ही पुराव्यांचा गठ्ठे मुख्यमंत्र्यांना आणून देऊ, असे रोहित पवार यांनी यावेळी म्हटले.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. मात्र, यानंतर महिलेला खंडणीच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी अटक केले. आरोपी महिला आणि तिच्याबरोबर असलेले काही सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विधानसभा सदस्य रोहित पवार यांच्या संपर्कात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.