सातारा प्रतिनिधी । मंजूर ईएसआयसी हॉस्पिटलची उभारणी एमआयडीसीतील जागेवर तातडीने सुरू करावी, तसेच छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ॲथलेटिक्सपटूंसाठी सिंथेटिक ट्रॅक आणि बास्केटबॉलसाठी इनडोअर बास्केटबॉल कोर्ट तयार करावे, आर्चरी खेळासाठी मैदानासह अन्य सुविधा निर्माण कराव्यात, आदी मागण्या खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय क्रीडा, कामगार आणि रोजगारमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केल्या.
यावेळी काका धुमाळ, ॲड. विनीत पाटील, सागर राजेमहाडिक, करण यादव उपस्थित होते. खा. उदयनराजेंनी दिलेल्या निवेदनात म्हटले, की साताऱ्यासाठी स्वतंत्र ईएसआयसी हॉस्पिटल मंजूर असून, त्यासाठी एमआयडीसीतील शासकीय दूध संघाची जागा या हॉस्पिटलला एक रुपये प्रतिस्केअर फूटप्रमाणे देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या जागेवर हॉस्पिटल उभारणीसाठी डीपीआर तयार करावा, हॉस्पिटलसाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ॲथलेटिक्सपटूंसाठी सिंथेटिक ट्रॅक नसल्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडापटू निर्माण होण्याला मर्यादा पडत आहेत.
२०१६ मध्ये रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भारताची प्रतिनिधित्व केलेली ललिता बाबर आणि अन्य ॲथलेटिक्सपटू जिल्ह्याने दिले आहेत. त्यामुळे येथे खेलो इंडियाच्या माध्यमातून सिंथेटिक ट्रॅक निर्माण करावा. येथे बास्केटबॉलपटूंसाठी इनडोअर बास्केटबॉल कोर्ट निर्माण करावे. आर्चरी खेळाचा जोराने प्रचार आणि प्रसार सुरू असून, युवा पिढीची आर्चरी खेळामध्ये विशेष रुची निर्माण होण्यासाठी शासनाने स्थायी सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. यासाठी आर्चरी खेळाचे मैदान आणि इतर सुविधा प्राधान्याने उपलब्ध कराव्यात. मंत्री मनसुख मांडविया यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.