सातारा प्रतिनिधी । अधिकाऱ्याची गाडी असल्याचे भासवून चक्क लाल दिव्याच्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सेवानिवृत्त लष्करी जवानसह जाधववाडीतील तोतया पोलिसाला अटक करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास यश आले आहे. भरारी पथकाने जि धडक कारवाई महागाव येथे नुकतीच केली आहे. संबंधितांकडून २५ लाखांच्या दोन मोटारींसह अडीच लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे.
नितीन दिलीप ढेरे (वय ३३, रा. जाधववाडी, मार्केटयार्ड) व सेवानिवृत्त लष्करी जवान शिवाजी आनंदा धायगुडे (५७, रा. अंदोरी, खंडाळा, सातारा) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, नेसरी-गडहिंग्लज रस्त्यावरील महागाव ओढ्यानजीक चारचाकीतून गोवा बनावटीची दारू आणून दुसऱ्या वाहनात भरले जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक स्नेहलता नरवणे यांना मिळाली. त्यांनी तातडीने जिल्हा भरारी पथकाला त्याठिकाणी पाठवून दिले. मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास ओढ्यानजीक लाल दिवा लावलेल्या वाहनातून हा मद्यसाठा दुसऱ्या वाहनात भरला जात असल्याचे दिसून आले.
यावेळी संशयित नितीन ढेरे अबकारी पोलिसांच्या गणवेशातच सापडला. दुसऱ्या मोटारीतील संशयिताचे नाव विचारले असता त्यानेही लष्करातून सेवानिवृत्त झालो असल्याचे सांगितले. महागाव ओढ्याजवळ ढेरे याने आणलेले मद्य संशयित धायगुडे याच्या मोटारीत भरण्याचे काम सुरू होते. यावेळी ढेरे याने मोटारीचा लाल दिवा सुरूच ठेवला होता. पथक घटनास्थळी आल्यानंतर खाकी गणवेश, नेमप्लेट, बेल्ट व शिक्क्यासह ढेरे याला पाहून भरारी पथकालाही धक्का बसला. त्यांनी दोघा संशयितांना ताब्यात घेत सर्व साहित्यही जप्त केले.