सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील संगम माहुली घाटावर पुरातन अशी मंदिरे आहेत. शिवाय नदीकाठ परिसर असल्याने या ठिकाणी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांचे चित्रीकरण देखील झालेले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून घाट परिसरात प्री-वेडिंग फोटोशूटसाठी येणाऱ्या मंडळींकडून चपला व बूट घालून मंदिर परिसरात फोटोशूट केले जात आहे. या प्रकारामुळे मंदिरांचे पावित्र्य धोक्यात येऊ लागल्याने विश्वेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सागं माहुली घाटावर प्री-वेडिंग फोटोशूटसाठी बंदी घालण्यात आली आहे.
सातारा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या संगम माहुली घाटाला इतिहासाची किनार आहे. महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या कृष्णा आणि वेण्णा या दोन पवित्र नद्यांचा संगम माहुलीजवळ आहे. या संगमाच्या एका तीरावर संगम माहुली आहे आणि दुसऱ्या तीरावर श्री क्षेत्र माहुली आहे. या घाटावर अनेक पुरातन मंदिरांची श्रृंखला असून, ही मंदिरे, घाट व कृष्णा- वेण्णा नद्यांना संगम कायमच सिनेसृष्टीला भुरळ घालत असतो. अलीकडच्या काही वर्षांत येथे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी येणाऱ्या वधू-वरांची संख्यादेखील वाढली आहे.
संबंधितांकडून फोटोशूट करताना मंदिर व परिसरात चपला, बूट घालूनच वावर केला जातो. बऱ्याचदा अस्वच्छतादेखील पसरविली जाते. त्यामुळे येथील मंदिरांचे पावित्र्य राखले जात नाही. याबाबत काही भाविकांकडून तक्रारी प्राप्त होताच विश्वेश्वर देवस्थान ट्रस्टकडून घाटावर प्री-वेडिंग फोटोशूटसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.