सातारा प्रतिनिधी । मुंबई येथून कोरेगाव तालुक्यातील शेंदुरजणेपर्यंत खासगी प्रवासी बसने प्रवास करत असणाऱ्या पेठ किन्हई येथील शालन वसंत भोसले यांच्या पर्समधून चोरट्याने तीन लाख ५२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शालन भोसले या नातवाच्या वाढदिवसासाठी मुंबई येथे गेल्या होत्या. त्यावेळेस घरून जाताना सोन्याचा राणीहार आणि नेकलेस पर्समध्ये घेऊन त्या गेल्या होत्या. कार्यक्रम उरकून त्या शनिवार, दि. १५ रोजी रात्री नऊ वाजता मुंबई येथून खासगी आरामबसमधून निघाल्या होत्या. शेंदुरजणे येथे सकाळी बसमधून त्या खाली उतरल्या.
सकाळी सव्वासहा वाजता त्या पेठ किन्हई येथील घरी पोहोचल्यानंतर त्यांना सोन्याचे दागिने ठेवलेली पर्स आढळून आली नाही. त्यांनी घर परिसरात त्याचा शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. याबाबात त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.