कराड शहराचे ग्रामदैवत कृष्णामाई मंदिरात चोरी; पोलिसांकडून तपास सुरु

0
359
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड शहरातील प्रीतिसंगम घाटावर कराडचे ग्रामदैवत असलेल्या कृष्णामाई मंदिरात चोरी झाल्याची घटना घडल्याची सोमवारी पहाटे मंदिराचे पुजारी मंदिरात पूजेसाठी आल्यानंतर उघडकीस आली. यामध्ये ४०० ते ५०० रुपयांची चिल्लर चोरट्याने लांबवली आहे. दरम्यान, याबाबत कोणीही तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णामाई मंदिराचे पुजारी आवटे यांनी चोरीच्या घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कराड येथील प्रीतिसंगमावर कृष्णा नदीच्या काठावर कराडचे ग्रामदैवत कृष्णामाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. सोमवार (दि. १७) रोजी पहाटे मंदिरात पूजा करण्यासाठी आले असता मंदिराच्या दरवाजांची कुलपे तुटली असल्याचे आणि मंदिरातील कुंडात पैसे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्याने मंदिराच्या नदीकडील दरवाजाचे कुलूप तोडून आतील दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून मंदिरातील एका कुंड्यात ठेवलेली सुमारे ४०० ते ५०० रुपयांची चिल्लर चोरट्याने लंपास केली. तसेच मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरीचे असे किरकोळ प्रकार वारंवार होत असल्याचेही आवटे पुजारी यांनी सांगितले. त्यामुळे कराडचे ग्रामदैवत कृष्णामाई मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, सदर घटनेबाबत कोणीही पोलिसात तक्रार दिली नसल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.