संगम माहुलीला टुरिझम स्पॉट करणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती

0
93
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । संगम माहुली येथील महाराणी ताराराणी यांची समाधी, छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीसह दोन्ही कृष्णा घाटाची डागडुजी करून टुरिझम स्पॉट तयार करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून चांगल्या आर्किटेक्टकडून डिझाईन बनवले जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकतायच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, साताऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या संगम माहुली येथे महाराणी ताराराणी यांची समाधी, छत्रपती थोरले शाहू महाराज, महाराणी येसूबाई यांच्या समाधी आहेत. यातील थोरले शाहूंच्या समाधीची डागडुजी करण्यात आली आहे, असे असले तरी महाराणी ताराराणी यांची समाधी, छत्रपती थोरले शाहू महाराज, महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. यासह याठिकाणी कृष्णा नदीकाठच्या संगम माहुली व क्षेत्र माहुली घाट व परिसराची डागडुजी केली जाणार आहे. याठिकाणी सुशोभीकरण झाल्यास पर्यटक व भाविक यांचा ओढा वाढणार आहे.

याठिकाणी टुरिझम स्पॉट तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. जिल्हा नियोजन समिती व इतर कोणत्या विभागातून सुशोभीकरणासाठी निधी मिळवता येईल का? यासाठी प्रयत्न करणार आहे. याबाबतचे नियोजन सुरु असून दोन्ही घाटाकडे ये-जा करण्यासाठी उत्तरप्रदेशच्या धर्तीवर देवस्थानकडे जाण्यासाठी जसे पूल बांधण्यात आले आहेत, तसा एखादा पूल बांधण्यात येणार आहे. चांगला आर्किटेक्ट पाहून त्यांच्याकडून डिझाईन बनवले जाणार आहे. पावसाळ्यात या दोन्ही समाधी पाण्यात येतात. त्यामुळे नुकसान होऊ नये व जे सुशोभीकरण करू ते कायमस्वरूपी टिकले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.