सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पासून सुमारे ७ किमी अंतरावरती असणाऱ्या मेट गुताड हद्दी मधील हॉटेल टीओजी नजिकच्या जंगल परिसरात मधून मोकाट कुत्र्यांच्या हल्यात एक सांबर जखमी झाले होते. जखमी झालेले सांबर एकाच घरात शिरल्यानंतर याबाबत वन विभागाच्या सहकार्यातून संबंधितांनी सांबरास नैसर्गिक अधिवासात सोडून देत जीवदान दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर पासून सुमारे ७ किमी अंतरावर मेट गुताड हद्दी मधील हॉटेल टीओजी नजिकच्या जंगल परिसरात मधून एक साबार जखमी अवस्थेत संतोष धनावडे यांच्या घरात शिरले. संतोष धनावडे व हॉटेल टी.ओ.जीचे व्यवस्थापक सूर्यकांत दळवी यांनी मोकाट कुत्र्यांना हिसकावून लावत सांबरास सुरक्षित ठेवले व सदरची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.
जखमी सांबराबद्दल माहिती मिळताच वनविभागाचे संतोष बावळेकर, वनक्षेत्रपाल गणेश महांगडे, वनपाल रणजीत काकडे, वनरक्षक तानाजी केळघणे, लहू राऊत घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. यानंतर जखमी व घाबरलेल्या सांबरास पाणी देत किरकोळ जखमांवरती औषध उपचार केल्यानंतर वनक्षेत्रपाल गणेश महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी संतोष बावळेकर यांनी जखमी सांबरास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.