सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वरच्या पसरणी घाटात रविवारी संध्याकाळी भीषण अपघाताची घटना घडली होती. या अपघातात पुण्यातील लोणी काळभोर येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. वाई-पाचगणी मार्गावर हा अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला होता. फोर्ड एंडेवर कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट १०० मीटर खोल दरीत कोसळली.या अपघातात लोणी काळभोर, रायवाडी येथील मृत्यू झालेल्या अक्षय म्हस्कू काळभोर (वय २६), सौरभ जालिंदर काळभोर (वय २६) या दोघांच्या पार्थिवावर लोणी काळभोर येथील स्मशानभूमीत काल शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी काळभोर येथील हे चार मित्र दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर ते घरी होळीचा सण घरी साजरा करण्यासाठी गुरुवारी दि.13 रोजी परतीच्या प्रवासाला निघाले होते. महाबळेश्वर- पाचगणी मार्गे पुण्याला जात असताना, पसरणी घाटातील बुवासाहेब मंदिराजवळ शंभर मीटर अंतरावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर घाट उताराचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी थेट दोनशे फूट खोल दरीत पाच वाजण्याच्या सुमारास कोसळली. या अपघातात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील अक्षय म्हस्कू काळभोर (वय-26) व सौरभ जालिंदर काळभोर (वय-26) या दोन मित्रांचा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचीम, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे व सिद्धनाथवाडी येथील शिवसह्याद्री रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जखमींना व मृत्यू पावलेल्या व जनांचे मृतदेह दोराच्या साह्याने खोल दरीतून बाहेर काढले. काल अपघातातील मृत्युमुखी पावलेल्या दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, अक्षय काळभोर व सौरभ काळभोर यांच्या निधनाने लोणी काळभोर गावावर शोककळा पसरली आहे. सौरभ हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि अवघ्या १५ दिवसांची मुलगी आहे. अक्षयचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. सौरभ आणि अक्षय यांनी भागीदारीत एम्पायर फिटनेस नावाने जिम सुरू केली होती. दोघांनी एकत्रित अनेक स्वप्नही रंगवली होतीतर अक्षयच्या पश्चात आई, वडील, भाऊ व पत्नी असा परिवार आहे.