सातारा प्रतिनिधी । ओमनी व सफारी या दोन वाहनांमध्ये झालेल्या जोरदार धडकेच्या भीषण अपघातात होलीचागाव येथील दोघे मित्र ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री खटाव तालुक्यातील निमसोड गावच्या हद्दीत निमसोड ते शिरसवडी रस्त्यावर घडली. राजू विठ्ठल लादे (वय 54 ) व सावकार आण्णा सावंत (वय 59, दोघेही रा. होळीचागांव ता. खटाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार दि. 12 रोजी रात्री सावकार व राजू हे जेवण करण्यासाठी चारचाकीतून निघाले होते. निमसोड गावच्या हद्दीत आल्यानंतर त्यांच्या भरधाव गाडीने दुसर्या चारचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात सावकार व राजू हे दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले.
यातील राजू लादे यांना वडूज ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर सावकार सावंत यांनाही गंभीर अवस्थेत कराड येथे हलवले. मात्र, त्यांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दोघांवर होळीचा गाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी तुषार पुनार्थ कचरे यांनी फिर्याद दिली आहे.