कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना एका मागून एक धक्के बसत आहेत. नुकतेच माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र ऍड. उदयसिह पाटील उंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्यानंतर आता विंग गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकराव खबाले यांनी देखील पृथ्वीराजबाबांची साथ सोडली आहे. शंकरराव खबाले आणि ॲड. उदयसिंह उंडाळकर या दोघांनी सोडलेली साथ पृथ्वीराजबाबांच्या नक्कीच जिव्हारी लागल्याचे दिसते.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावता भाजपने चांगलीच उभारी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर काँग्रेसला या मतदार संघात अधोगती प्राप्त झाली आहे. पृथ्वीराजबाबांच्या पराभवानंतर त्यांचे एक एक सहकारी त्यांना सोडून महायुतीमधील पक्षात दाखल होत आहेत. काही जण कमळ तर काहीजण घड्याळ हाती बांधत आहेत. परिणामी विधानसभेतील पराभवामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत.
माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह उंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी तसे जाहीर देखील केले आहे. उंडाळकर यांनी काँग्रेस सोडलेली असतानाच माजी जिल्हा परिषद सदस्य शंकराव खबाले यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात पृथ्वीराजबाबांचीताकद हळू हळू कमी होताना दिसत आहे.
दरम्यान, विंग गटातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी, तसेच आपल्या कार्यकर्त्यांना बळ मिळावे, यासाठीच आपण सत्ताधारी भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या मागे दुसरा कुठलाही हेतू नाही, असे शंकराव खबाले यांनी स्पष्ट केले असले तरी शंकरराव खबाले आणि ॲड. उदयसिंह उंडाळकर या दोघांनी सोडलेली साथ पृथ्वीराजबाबांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते.