वाईतील बावधनच्या बगाड यात्रेचे यंदाचे मानकरी ठरले अजित ननावरे; ‘या’ दिवशी आहे बगाड यात्रा

0
172
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा (Bavdhan Bagad Yatra) महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या बगाड यात्रेचा यावर्षीचा बगाड्या होण्याचा मान अजित बळवंत ननावरे (Ajit Balwant Nanavare) यांना मिळाला आहे. दि. १९ मार्च रोजी बावधन येथे बगाड यात्रा होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साताऱ्यातील वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा येत्या १९ मार्च रोजी पार पडणार आहे. साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा इंग्रज काळाच्या अगोदरपासून बावधनमध्ये भरते.होळी पौर्णिमेच्या दिवशी रात्री १२ वाजता देवाला कौल लाऊन या यात्रेतील बगाड्या होण्याचा मान ठरविला जातो.

बावधन बगाड २०२४ चा यात्रेचा “बगाड्या” होण्याचा मान श्री. विकास तानाजी नवले यांना मिळाला होता. त्यांच्यानंतर आता अजित ननावरे यांना यंदाच्या बगाड्याचा मान मिळाला आहे.

बावधन यात्रेचा बगाडी नेमका कसा ठरवला जातो?

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन गावातील यात्रा म्हणजेच सुप्रसिद्ध बावधनची यात्रा. या यात्रेतील सर्वात मुख्य आकर्षणाचा विषय असतो ते म्हणजे ‘बगाडी’ होय. या यात्रेदरम्यान दरवर्षी एका व्यक्तीला हा बगाडी होण्याचा मान मिळतो. हा बगाडी नेमका कसा निवडला जातो? बावधनचा हा बगाडी होळी पौर्णिमेला रात्री १२ वाजता ठरवला जातो. ग्रामस्थ आणि बावधन बगाड यात्रा समिती एकत्र येऊन कौल काढतात आणि बगाड्याचं नाव घोषित करतात. नुकताच हा कौल काढण्यात आला. यावेळी डाव्या बाजूला पाच कौल आणि उजव्या बाजूला पाच कौल असतात. म्हणजेच उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला गहू असतात. प्रत्येक नवसपूर्ती व्यक्तींच्या नावाने गहू गाभाऱ्यामध्ये लावले जातात. उजव्या बाजूचा जो गहू पडेल तो बगड्या म्हणून निवडला जातो. म्हणजे उजवा कौल ज्याच्या नावाने लागेल त्याच्यावर बगाड येते. यानंतर सर्वांच्या संमतीनं पंच बगाड्याचं नाव घोषित करतात.

‘अगं बाई अरेच्चा’मध्ये दाखवलेली साताऱ्यातील सर्वात मोठी ‘बगाड यात्रा’

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बगाड यात्रेची आठवण करून देते ते ‘ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती…’ हे गाणे. हे गाणे ऐकल्यावर आपसूकच तुम्हाला ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटाची आठवण होते आणि या गाण्यातील बगाड यात्रेतील बगाड्याचे क्षण डोळ्यासमोर उभे राहतात. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘बगाड यात्रा’ यावर्षी १९ मार्च रोजी आहे?