सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यावर्षी मार्च महिन्यातच पाणीटंचाईची स्थिती जाणवू लागली आहे. या टंचाईचा फटका एप्रिल ते जून या काळात ४७३ गावे आणि ६५७ वाड्यांना बसू शकतो, असा अंदाज आहे. जिल्हा प्रशासनाने या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी एक कृती आराखडा तयार केला आहे आणि तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या आराखड्यानुसार, टंचाई निवारणासाठी १४ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सातारा जिल्ह्यात दरवर्षी चांगला पाऊस पडत असला तरी, उन्हाळ्यात टंचाईची स्थिती जाणवतेच. यामुळे प्रशासनाकडून टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. गेल्या वर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२५ टक्के पाऊस पडला होता, तरीही यंदा टंचाई लवकरच जाणवू लागली आहे. माण तालुक्यात शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडूनही संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई जाणवण्याचा अंदाज आहे. येथील टंचाई निवारणासाठी ८ कोटी ६० लाख ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोरेगाव तालुक्यात २ कोटी ७ लाख, पाटणला सुमारे १ कोटी २१ लाख, तर खटाव तालुक्यात ३४ लाख, खंडाळा ७ लाख, फलटण तालुका ८६ लाख ५७ हजार, वाई ६५ लाख १५ हजार, जावळीत ३६ लाख तर क-हाडला १४ लाख ५८ हजार, महाबळेश्वर तालुक्यातही २९ लाख ४४ हजार रुपये टंचाईवर खर्च होण्याचा अंदाज आहे. माण तालुक्यात ८९ गावे आणि ५३२ वाड्यांना टंचाईची झळ बसू शकते.