सातारा प्रतिनिधी । दरवर्षी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामातील पिकांची स्पर्श घेतली जाते. राज्य शासन कृषी विभागामार्फत सन २०२३-२०२४ मध्ये रब्बी हंगामातील हरभरा, गहू व रब्बी ज्वारी पीक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्हास्तरावरील ९ बक्षीसपात्र शेतकऱ्यांपैकी ६ शेतकरी वाई तालुक्यातील आहेत. सन २०२३-२०२४ रबी हंगामामध्ये तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत रब्बी ज्वारी, गहू, हरभरा पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तालुक्यातील ५० शेतकरी सहभागी झाले होते.
पीक स्पर्धेत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व कृषी विभागाच्या अधिका-यांच्या देखरेखीखाली पीक कापणी प्रयोग आयोजित करून त्यानुसार पिकांच्या उत्पादनांची नोंद घेण्यात आली. गहू पिकात जिल्ह्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक तालुक्यातील शेतकऱ्यांनी पटकावले. रब्बी ज्वारी पिकात जिल्हास्तरीय स्पर्धेत देवीदास काळे (परबंदी) यांनी प्रथम, रमेश गायकवाड (काळंगवाडी) यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे. जिल्हास्तरीय हरभरा पीक स्पर्धेमध्ये ओझर्डे येथील
शेतकरी नितीन पिसाळ यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. वाई विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी संतोष बरकाई, तालुका कृषी अधिकारी प्रशांत सहे तसेच सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायकांनी पीक स्पर्धमधील विजेत्या मार्गदर्शन केले आहे.