कराड प्रतिनिधी । मात्सोद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या निर्धाराला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांनी घरचा आहेर दिला आहे. “मी नितेश राणे यांचे वक्तव्य ऐकलेले नाही. पण, छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती. जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो. त्यांनी हिंदू-मुस्लीम असा कधी भेदभाव केला नाही. राणे यांनी जे वक्तव्य केले आहे. त्यावर एवढं म्हणणें कि मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ज्यांना खायचे आहे त्यांनी खावं, असे खा. उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मंत्री नितेश राणेंना असं म्हणायचे असेल की औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालले आहे, ते खोदून काढा. मी तर किती वेळा तरी सांगितलं आहे की, तो आक्रमण करायला आला होता. शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते तर आपण अजून देखील गुलामगिरीत असतो, हे विसरू नका. त्याचा अर्थ तसा काढू नका, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

प्रीतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना केलं अभिवादन
दिवंगत काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 112 वी जयंती असून त्यांच्या समाधीस्थळी दिवसभरात विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनी उपस्थिती लावत अभिवादन केले. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांनी उपस्थिती लावली. तर दुपारी साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील समाधीस्थळी येऊन अभिवादन केले. व माध्यमांशी संवाद साधला.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
नितेश राणे म्हणाले की, आज आम्ही महाराष्ट्रातील हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झाले आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील. 100 टक्के हिंदू समाजाचे प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेले आढळणार नाही. मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये, असा आवाहन यानिमित्ताने मी करतो. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित. असा दावाही मंत्री नितेश राणेंनी केला.
काय आहे मल्हार सर्टिफिकेट?
मल्हार सर्टिफिकेट हे झटका मटणासाठीचं प्रमाणपत्र आहे. हे सर्टिफिकेट हिंदू खाटिकांना देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र प्रमाणित करते की ज्या बकरी, शेळीचं हे मटण आहे ते हिंदू रिती रिवाजाने कापण्यात आलं आहे. त्यात भेसळ नाही. सर्वात महत्त्वाचं हे मल्हार सर्टिफिकेट फक्त हिंदू खाटिक आणि हिंदू समाजाच्या मटण विक्रेत्यांनाच मिळणार आहे. ही माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.