राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची घोर निराशा; बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील यांची टीका

0
306
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राज्याचा २०२५ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक विकास कामांवर हजारो कोटी रुपये खर्च करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. या घोषणानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आला. या अर्थसंकल्पावर बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील यांनी देखील सडकून टीका केली आहे. “या अर्थसंकल्पात शेतकऱ्याला राज्य सरकारने घंटा सुद्धा मदत केलेली नाही. राज्यातील शेतकरी या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसला होता सरकारला त्याची थोडीफार सुद्धा दया आली नाही. यातून येणाऱ्या काळात शेतकरी उध्वस्त कसा होईल याची आखणी आजच्या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी पिकवावे आणि आम्हाला फुकट खायला मिळावे, अशी धारणा सरकारची दिसत आहे. सरकार खाणाऱ्यांचा विचार करत आहे पिकवणारांचा नाही हे आज सिद्ध झाले असल्याची टीका पंजाबराव पाटील यांनी अर्थसंकल्पावर केली आहे.

राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. यावेळी पंजाबराव पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. त्यामुळे आज रोजी शेतकऱ्यांना बँकांचे सावकारांचे कर्ज घेतले शिवाय शेती करता येत नाही ही सत्य परिस्थिती आहे. राज्याच्या मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतमालाच्या हमीभाव खरेदी केंद्र बाबत व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी बाबत कोणताच निर्णय सरकारने घेतलेला नाही. यामुळे शेतकरी कर्जाची फेड करू शकत नाही.

शेतकऱ्यांच्या मुलाला नोकऱ्या नाहीत, उद्योग करायला भांडवल नाही, व्यवसाय केल्यास मार्केट नाही. त्यामुळे आजचा तरुण शेतकरी शेती करायला तयार नाही. येणाऱ्या काळात शेती करणे तोट्याचे असल्यामुळे शेती व्यवसाय कायमचा बंद होईल अशी परिस्थिती सगळीकडे झालेली दिसत आहे. सरकारच्या मदतीशिवाय शेती करणे आज रोजी शक्य नाही यासाठी आजच्या अर्थसंकल्पात आर्थिक मदत काही तरी मिळेल अशी असशा बाळगतात याकडे राज्यातील शेतकऱ्यांनी डोळे लावून बसलेले होते. परंतु त्यांची सरकारने घोर निराशा केलेली पाहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया पंजाबराव पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.