सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील कास मार्गावरील पिसाणी गावातील श्रीपेटेश्वर मंदिराच्या परिसरात पिंपळ वृक्ष आहे. येथील पिंपळाचे झाड प्राचीन काळापासून खूप पक्ष्यांचे अन्नदाता म्हणून काम करत आहे. शनिवारी पिंपळ वृक्षाने भारतातील केरळ, अरुणाचल प्रदेश, म्यानमार, चीनमधील राज्यपक्षी म्हणून ओळख असणाऱ्या ‘महाधनेश’ तीन पक्ष्यांना आपली झाडाची गोड फळे खाण्यास यायला भाग पाडले.
महाधनेश भारतीय उपखंड, मुख्यभू आग्नेय आशिया, द्वीपीय आग्नेय आशियातले सुमात्रा बेट भूप्रदेशांत आढळणारा धनेश पक्षीकुळातील एक पक्षी. मराठीमध्ये मलबारीधनेश, गरुडधनेश किंवा राजधनेश नावांनीही ओळखतात. अतिशय सुंदर रंगांनी पक्षी लक्ष वेधून विविध प्रकारची फळे मुख्य खाद्य आहे. झाडाच्या ढोलीत घरटे बांधून चिखलाने झाकून टाकतो. पिल्लांसाठी केवळ अन्न देता येईल एवढी एकच लहान उभी फट ठेवून फटीतून पिल्लांना चारा पुरवला जातो. पक्ष्याची चोच मोठी, सिंगासारखी असल्यामुळे इंग्रजीत ‘हॉर्नबिल’ म्हणतात.
हा पक्षी भारतातील केरळ आणि अरुणाचल प्रदेश आणि म्यानमार मधील चिन राज्याचा राज्य पक्षी आहे. तसेच भारतात पक्ष्यांवर संशोधन करणाऱ्या अग्रणी संस्था बी. एन. एच. एस या संस्थेचे मानचिन्ह आहे. या पक्ष्यांची चोच फार मोठी व सिंगासारखी असल्यामुळे यांना इंग्रजी भाषेत हॉर्नबिल हे नाव दिलेले आहे. या पक्ष्यांचे एकंदर स्वरूप असामान्य असते. ब्यूसेरॉटिड़ि या पक्षिकुलात यांचा समावेश केलेला आहे. आफ्रिकेत सहाराच्या दक्षिणेस व दक्षिण आशियात भारतापासून फिलिपाईन्स बेटांपर्यंत ते आढळतात. पण ऑस्ट्रेलियात मात्र ते नाहीत यांच्या एकूण सु. ४५ उपजाती आहेत.
भारतात धनेशाच्या 5 जाती
भारतात धनेशाच्या पाचसहा जाती आहेत. यांपैकी मोठा धनेश (ग्रेट हॉर्नबिल) सगळ्यात मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ब्यूसेरॉस बायकॉर्निस असे आहे. ही जाती पश्चिम घाटात मुंबईपासून कन्याकुमारीच्या भूशिरापर्यंत आणि हिमालयाच्या खालच्या रांगांमध्ये १,५२५ मी. उंचीपर्यंत आढळते. बाकीच्या जातींपैकी करडा धनेश वा सामान्य धनेश ही जाती फक्त भारतातच आढळणारी असून तिचे शास्त्रीय नाव टॉकस बायरोस्ट्रीस असे आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून खाली सगळीकडे (मलबार किनारा, थोडा राजस्थान व आसाम वगळून) ती आढळते. बाकीच्या जाती वेगळ्या भागांत आढळतात.
अशी आहे शरीराची रचना
मोठ्या धनेशाची लांबी सुमारे १३० सेंमी. असते. डोके, पाठ छाती वा पंख काळे असून पंखांवर आडवा पांढरा पट्टा असतो. मान व पोट पांडरे असते, शेपटी लांब व पांढरी असून तिच्या टोकाजवळ काळाआडवा पट्टा असतो. नराचे डोळे तांबडे व मादीचे पांढरे असतात. चोच मोठी मजबूत बाकदार व पिवळी असते, डोके आणि चोचीचे बूड यांवर एक मोठे शिरस्त्राण असते, त्याचा रंग पिवळा असून वरचे पृष्ठ खोलगट असते, पायांचा रंग काळपट असतो.