कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील जांभळदेवी तथा आमराई नावाच्या शिवारात तब्बल २२ शेळ्यांवर तरसाच्या कळपाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. यामध्ये हल्ल्यात शेळ्या मृत्यू पावल्या असून आज शुक्रवारी सकाळी हि घटना उघडकीस आली. दरम्यान, वन अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कोपर्डे हवेली गाव परिसरात बेघर वस्तीतील आमराई तथा जांभळदेवी नावाची शिवारे आहेत. या शिवारात गावातील बाळासो श्रीपती चव्हाण यांनी आपल्या शेडमध्ये २२ शेळ्या बांधल्या होत्या. रात्रीच्या वेळी तरसाच्या कळपाने चव्हाण यांच्या शेळ्यांवर हल्ला केला. तरसाच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात २२ शेळ्या जागीच मृत्युमुखी पडल्या.
दरम्यान, आज सकाळी बाळासो चव्हाण हे नेहमीप्रमाणे जनावरांना चारा टाकण्यासाठी व शेळ्यांना बघण्यासाठी शेडमध्ये आले असता त्यांना आपल्या शेळ्या या मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती चव्हाण यांनी गावातील ग्रामस्थांना तसेच वन अधिकाऱ्यांना दिली. तसेच ग्रामस्थांसह विभागाच्या वन क्षेत्रपाल ललिता पाटील, मसूर वनपाल संतोष शिंदे, मलकापूर वन पाल आनंद जगताप, हेळगाव वनरक्षक रोहन माने, वन रक्षक कुट्टे, वन कर्मचारी शशिकांत जाधव, शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घटनास्थळी भेट देत पंचनामा करण्याचे काम असुरू करण्यात आले आहे. तरसाच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात २२ शेळ्या मृत्युमुखी पावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे सुमारे २ लाखाहून अधिकचे रुपयांचे नुकसान झाले आहे.