सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यात शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत लक्ष्मी मुक्ती योजनेनुसार ७०९ खातेदारांच्या वारस नोंदी करण्यात आल्या आहेत. एकत्र कुटुंब मॅनेजर या उपक्रमातील १०३ खातेदारांचे शेरे कमी करण्यात आल्याची माहिती साताऱ्याचे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाला शंभर दिवसाचा कृती आराखडा (सुकर जीवनमान) कार्यक्रम आखून दिला आहे. या कार्यक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील टप्प्याटप्प्याने घेत आहेत. सातारा महसूल विभागांमध्ये राबवण्यात आलेल्या कृती आराखडा कार्यक्रमाचे सादरीकरण नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आले यामध्ये एकत्र कुटुंब मैनेजर ही संज्ञा कमी करण्यासाठी एकत्र कुटुंब मॅनेजर यांचा अर्ज, एकत्र कुटुंब मैनेजर दाखल झाले याबाबत फेरफार जमिनीचे सातबारा उतारे इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत. वारस नोंदी करणे कामी प्रतिज्ञापत्र, मयत खातेदाराचा मृत्यू दाखला, आणि शेतीचा सातबारा खाते उतारा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्नीचे नाव सातबारा सदी दाखल करण्यासाठी खातेदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र आणि जमिनीचा खाते उतारा इत्यादी कागदपत्रे सक्तीचे आहेत. तहसीलदार नागेश गायकवाड यांनी विकास कृती कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, सातारा तालुक्यात बारा पानंद रस्ते खुले करण्यात आले आहेत. १०३ खातेदारांचे एकत्र कुटुंब मॅनेजर शेरे कमी करण्यात आले आहेत. ७०९ खातेदारांच्या वारस नोंदी निर्धारित झाल्या आहेत. लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत तीन खातेदारांच्या नोंदी कागदपत्रांवर घेण्यात आले आहेत तसेच १४ ८३४ गट नंबर वरील तुकडा असा शेरा कमी करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाणंद रस्ते खुले करणे, वारस नोंदी, अतिक्रमित पानंद रस्ते खुले करणे, लक्ष्मी मुक्ती योजना या विविध योजना महसूल विभागाला अंमलबजावणी साठी निर्देशित केल्या आहेत. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी यांच्याकडे अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.