सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यातील मोटेवाडी-म्हसवड व वडजल या दोन गावातील अल्पवयीन मुलींना फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी दोन संशयित आरोपींविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दोन गुन्ह्यांतील संशयित आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले.
म्हसवड पोलिस ठाण्यात वरील दोन गावातील दोन अल्पवयीन मुलींचे अज्ञात व्यक्तींनी फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यास प्रथम प्राधान्य देत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतले. या गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती याद्वारे या दोन्ही गुन्ह्यातील अपहरण केलेल्या मुली आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही मुलांना पंढरपूर व कराड या ठिकाणावरून शिताफीने शोधून पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आलेले आहे.
या दोन्ही गुन्ह्यातील फरार झालेल्या आरोपींना शोधून काढण्यास सदरची कामगिरी ही जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि ठाणे अंमलदार यांनी केलेली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, महिला पोलीस हवालदार मैना हांगे, पोलीस नाईक अमर नारनवर, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे आदींचा या गुन्ह्यातील आरोपींचा शोध मोहिम पथकात समावेश होता.