धोमचे पाणी जिहे-कठापूरला सोडल्‍याने पाणी बचाव संघर्ष समिती आक्रमक; दिला थेट इशारा आंदोलन

0
354
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांच्या वतीने सातारा सिंचन मंडळ, सातारा सिंचन विभाग, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके, सचिव नंदकुमार माने यांच्या सह्या आहेत. यावेळी धोम धरणातून कृष्णा नदीपात्रात जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी सोडलेले नियमबाह्य पाणी तातडीने बंद करावे, अन्यथा मंगळवारी सातारा सिंचन भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा संघर्ष समिती वाई- जावळी- सातारा- कोरेगावच्या वतीने देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, धोम धरणातून कृष्णा नदीपात्रातून जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी १५ फेब्रुवारीला पाणी सोडल्याची माहिती आम्हाला त्याच दिवशी मिळाली होती, तर १७ फेब्रुवारीला कोयनानगर येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्‍यासमोर जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेला नियमबाह्य पद्धतीने सोडल्या जाणाऱ्या पाण्याला आम्ही विरोध केला होता. त्यावर जलसंपदामंत्र्यांनी आपण याविषयी मार्चमध्ये मुंबईत बैठक घेऊन पाणी वाटपाबद्दल चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते; परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नसताना धोम धरणातून जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी नियमबाह्य पाणी सोडण्यात आले आहे.

त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत येणार आहे. धोम धरण प्रकल्प व कृष्णा नदीवरील उपसा सिंचन योजना यांच्या प्रकल्प अहवालानुसार धरणातील साठ्यातून नदीच्या पात्रात पाणी सोडण्याबाबत कोणतीही तरतूद नाही. मुळात जिहे- कठापूर उपसा योजना ही चारमाही (खरीप) असून, या योजनेसाठी पावसाळ्यात वाहून जाणारे ३.१७ टीएमसी पाणी दुष्काळी भागासाठी चारमाही योजनेतून द्यायचे आहे. मागील पावसाळ्यात धोम धरणातून ४.६९ टीएमसी पाणी सोडले आहे. त्यामुळे आजमितीस धोम धरणातील साठ्यामधून पाणी देय नसल्‍याची नोंद घ्यावी.

या योजनेला खरीप हंगामात सोडण्यासाठी धोम बलकवडी धरणातून ०.५३ टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. त्याचा वापर खरीप हंगामात देण्‍यासाठी आहे. महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाच्या नियमानुसारही जिहे- कठापूर योजना चारमाहीच आहे. त्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामासाठी जिहे- कठापूर योजनेला धोम- बलकवडी धरणातून पाणी सोडता येणार नाही, असे प्राधिकरणाच्या दि. ९ एप्रिल २०१९ च्या निकालपत्रात स्पष्ट केलेले आहे.