सातारा प्रतिनिधी । इव्हीएम मशीनवर सर्वसामान्य जनतेला शंका आहे. विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आलेलाच आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात. त्याद्वारे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल आणि या विषयातील सत्य समाजासमोर येईल, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शॅडो कॅबिनेटमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी सत्ताधारी महायुतीचे हिंदुत्व, लोकसभा निवडणुकीतील पराभव यासह विविध विषयांवर भाष्य केले. कोरेगाव मतदारसंघामध्ये विरोधकांकडून जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याच्या प्रश्नावर त्यांनी जर काढायचे असेल तर सर्वांचेच बाहेर काढावे लागेल. एकदा काय तो सामना होऊन जाऊ दे, असा इशारा आमदार शिंदे यांनी यावेळी विरोधकांना दिला.