कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन, उच्च दर्जाची साखर निर्मिती करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया या सर्वोच्च संस्थेकडून ‘जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘जयवंत शुगर्स’ला मिळालेला हा १७ वा पुरस्कार असून, या सन्मानामुळे जयवंत शुगर्सच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जयवंत शुगर्स’ने नेहमीच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करत, साखर उद्योग क्षेत्रात मोलाची कामगिरी बजाविली आहे. ‘जयवंत शुगर्स’ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत साखरेच्या उत्पादनातील वाढ, अन्य उपपदार्थांची निर्मिती व वाढत्या साखर उताऱ्यात सातत्य राखून, साखर उद्योगात उत्तुंग भरारी घेत एक आदर्श निर्माण केला आहे. कारखान्याच्या या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेत, राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नवी दिल्ली येथे ‘इंटरनॅशनल कमिशन फॉर युनिफॉर्म मेथड्स ऑफ शुगर अॅनालिसिस’च्यावतीने भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात, अध्यक्ष डॉ. मार्टिजन लीजडेकर्स, जनरल सेक्रेटरी डॉ. डायर्क मार्टिन व असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय अवस्थी यांच्या हस्ते जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासमवेत कारखान्याचे चिफ केमिस्ट बी. जी. चव्हाणके उपस्थित होते.
कार्यक्रमाला वसंतदादा शुगर्स इन्स्टिटयूटचे डायरेक्टर जनरल संभाजीराव कडू-पाटील, मार्क लॅबच्या डॉ. वसुधा केसकर, डॉ. एस. एस. निंबाळकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय किर्तीचे तंत्रज्ञ, तसेच भारतातील साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले, मार्गदर्शक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, श्री. विनायक भोसले यांनी ‘जयवंत शुगर्स’चे सर्व सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार अशा सर्वांचे अभिनंदन केले आहे.